BREAKING NEWS
HEADLINE NEWS
टी-20त झिम्बाब्वे झिंगाट................
Posted on: 18-06-2016

हरारे: वृत्तसंस्था


शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक पहिल्या टी-20  लढतीत झिम्बाब्वेने टीम इंडियावर 2 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला आणि तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. एल्टोन चिगुम्बुराच्या नाबाद अर्धशतकाच्या (54) बळावर  6 बाद 170 धावा ठोकणार्‍या झिम्बाब्वेने टीम इंडियाला 6 बाद 168 धावांत रोखले. 

171 धावांचे टार्गेट असलेल्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी प्रारंभीच दबावात आणले. 12 षटकात  4 बाद 90 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मनीष पांडे (35 चेंडूत 3 षटकार व एका चौकारासह 48) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद 19) यांनी पाचव्या विकेटसाठी 5 षटकात 53 धावांची भागीदारी करून भारताला विजयीपथावर नेले होते. 18 व्या षटकात पांडे बाद झाल्यावर अक्षर पटेलने 9 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकारासह  18 धावा चोपल्या. पण शेवटच्या षटकात तोही बाद झाला व झिम्बाब्वेने जोरदार कमबॅक केला.

चिगुम्बुराची फटकेबाजी

तत्पूर्वी, एल्टोन चिगुम्बुराने शेवटच्या पाच षटकात भारतीय गोलंदाजांची तुफान धुलाई करीत झिम्बाब्वेच्या खात्यात तब्बल 60 धावा जमा केल्या. 28 चेंडूच्या खेळीत चिगुम्बुराने 7 षटकारही खेचले. 17 व्या षटकात झिम्बाब्वेची अवस्था 6 बाद 130 अशी होती; पण शेवटच्या तीन षटकात चिगुम्बुराने चित्रच पालटून टाकले. जयदेव उनाडकेटने टाकलेल्या 19 व्या षटकात 19 तर जसप्रित बुमराहने टाकलेल्या शेवटच्या षटकात 15 धावा वसूल केल्या. 

सिकंदर रझा (20) व विकेटकिपर माल्कम वॉलेर (30) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. 13 व्या षटकात रझा धावचित झाल्यानंतर चहलने वॉल्टरची दांडी उडवली. मग चिगुम्बुराने डावाची सूत्रे हाती घेतली. 

धोनीचा ‘फिनिशिंग टच’  हुकला... 

शेवटच्या षटकात टीम इंडियाचा विजयासाठी फक्‍त 8 धावांची गरज होती. डॉनाल्ड त्रिपानोने टाकलेल्या या षटकात पहिल्या चेंडूवर धोनीला फक्‍त 1 धाव काढता आली. दुसर्‍या चेंडूवर अक्षर पटेल बाद झाला. मग आलेल्या ऋषी धवनने षटकार खेचण्याच्या नादात दोन चेंडू निर्धाव खेळले. त्यात एक वाईडची धाव मिळाली. पाचव्या चेंडूवर धवनने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली. 

शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावांची गरज होती. पण धोनीने मारलेला फटका डिप पॉइंटला सरळ फिल्डरच्या हाती गेला आणि  त्रिपानोसह झिम्बाब्वेचे प्रेक्षक व खेळाडूंनी तुफानी जल्‍लोष केला. शेवटच्या चेंडूवर षटकार किंवा चौकार खेचत विजय खेचणारा धोनी झिम्बाब्वेच्या नवख्या गोलंदाजासमोर साफ हुकला आणि टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली. या लढतीत टीम इंडियाने पाच नव्या चेहर्‍यांना संधी दिली. त्यात ऋषी धवन, मनदीपसिंग, जयदेव उनाडकेट आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. 

संक्षिप्‍त धावफलक 

झिम्बाब्वे 6 बाद 170 (चिगुम्बुरा नाबाद 54, वॉलेर 30. बुमराह 24 धावांत  2 विकेट) भारत 6 बाद 168 (मनीष पांडे 48, मनदीपसिंग 31. मुझारबानी व चिबाहबाह प्रत्येकी 2 विकेट)

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक