BREAKING NEWS
HEADLINE NEWS
डिजिटल शिक्षण पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय ज्ञानाची दालने खुली -देवेंद्र फडणवीस
Posted on: 27-06-2016

गर्जा महाराष्ट्र ऑनलाइन मिडिया,मुंबई


कोल्हापूर, दि. 26 :  शिवाजी विद्यापीठाने व्हर्च्युअल क्लासरूम सारखी आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत. या डिजिटल शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ज्ञानाची दालने खुली करण्यात शिवाजी विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विद्यापीठाने नॅशनल इंस्टीट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मार्फत देशात 28 वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

     याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या प्रकल्प संचालिका मनीषा वर्मा, खा.संभाजी राजे छत्रपती, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, बीसीयूडीचे संचालक डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव व्ही.एन. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नूतन बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील व्हर्च्युअल क्लासरूम तसेच वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र इमारतीच्या भूमिपूजनच्या कोनशीला अनावरणाचे डिजिटल उद्घाटन करण्यात आले. तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्युझियम कॉम्लेक्सच्या भूमिपूजनाच्या कोनशिलेचे डिजिटल उद्घाटन केले.

     डिजिटल अभ्यासक्रमामुळे ग्रामीण व शहरी शिक्षणातील दरी भरून निघण्यास मदत होत आहे. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे भांडार खुले झाले आहे. आजच्या काळात विकासाच्या वाटा या संवाद माध्यमातून जातात. त्यामुळे उच्च शिक्षण देऊन पदवीधर तयार करण्यापेक्षा या पदवीधरांच्या ज्ञानाच्या कक्षा कशा रूंदावतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून प्राध्यापक एकाच वेळी शंभर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, ही मोठी उपलब्धी आहे. तसेच आजच्या काळात प्रगत तंत्रज्ञान अवगत असलेले पत्रकार तयार होणे, हीसुद्धा काळाची गरज आहे. पत्रकारांना अनेक आव्हाने पेलावी लागतात. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाने नवीन आधुनिक अभ्यासक्रमाची निर्मिती करावी. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तसेच इतर चांगल्या गोष्टींसाठी हे सरकार खंबीरपणे साथ देईल. भविष्यात उभारण्यात येणाऱ्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून सामान्य माणसापर्यंत शिक्षण पोहचण्यासाठी कार्य केलेल्या शाहू महाराजांच्या भूमीत शिवाजी विद्यापीठाची ही वाटचाल अशीच चालू राहू दे, अशा शुभेच्छा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

     शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी केंद्र सरकार आग्रही असून, केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वापरण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्याचा योग्यरित्या विनियोग व्हायला हवा. शिवाजी विद्यापीठाची अनेक पातळ्यांवर यशस्वी वाटचाल सुरु असून शिवाजी  विद्यापीठाने अजूनही उंच झेप घेण्यासाठी प्रयत्न करावेत. चांगल्या गोष्टींसाठी सरकार नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी दिली.  

     शिवाजी विद्यापीठाला नॅशनल इंस्टीट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये देशात 28 वा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभेच्छा पत्र प्रदान करण्यात आले. तर शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा अहवाल कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी केले.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक