BREAKING NEWS
HEADLINE NEWS
पद्मश्री डॉ.तात्यासाहेब लहाने..... ( संघर्षरथ )
Posted on: 29-06-2016

गर्जा महाराष्ट्र ऑनलाइन मिडिया,मुंबई


प्रतिनिधी:विशाल पाटील

प्रश्न - सर्वसामन्य घरामध्ये झालेला तुमचा जन्म,खेडेगावतील तुमचे बालपण आणि तेथील प्राथमिक शिक्षणाच्या तुमच्या काय आठवणी आहेत ?

तात्यासाहेब लहाने :- माझा जन्म लातुरमधील या खेडेगावत २४ जून १९५७ साली झाला आई-वडील शेतकरी असलेल्या कुटुंबात माझ्यासह सात भावंड होतो. कुटुंबाचा सारा चरितार्थ हा शेतीतील उत्पन्नावरच चालत असे. त्यामुळे आम्हा सर्वांनाच शेतात काम करावे लागे. गावात एक प्राथमिक शाळा होती त्या शाळेत फारच कमी मुले शिकायची. माझा त्या शाळेत वयाच्या सहाव्या वर्षी झाला पण त्यावेळी शाळेत कमी आणि शेतात जास्त अशीच परीस्थिती होती. शाळेचा अभ्यास हा रात्रीच्या वेळी कधीच करता येत नव्हता कारण त्यावेळी घरामध्ये वीजेची सोय नव्हतीच रॉकेलवर चालणारे कंदील असायचे पण ते आमच्या घरी नसायचे त्यामुळे सकाळी सूर्यप्रकाश आला की गाई-म्हशींना चारवतानाच अभ्यासाचे पाठांतर करावे लागायचे इयत्ता चौथीपर्यंत माझी अशीच शाळा चालू होती. त्यावेळी चौथीची बोर्ड परीक्षा मी दिली आणि त्यामध्ये मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो याच वेळी गावामध्ये कामधेनु विद्यालय नावची संस्था गावत कार्यरत झाली. चांगला विध्यार्थी आहे म्हणून त्या संस्थेतील हेडमास्तर हे माझ्या वडिलांना भेटायला घरी आले आणि त्या संस्थेमध्ये माझे पाचवीचे शिक्षण सुरु झाले पाचवीचा प्रवास ही असाच होता म्हणजेच शेतीचे काम सांभाळून मला शाळा करावी लागे याकाळात अभ्यासासाठी माझा मित्र सूर्यप्रकाश हाच होता कारण त्याच्याच सानिध्यात गाई-म्हशींना चारवतानाच अभ्यासाचे पाठांतर करावे लागत असे आणि हा काळ १९६५ चा होता यावेळी अभ्यासासाठी मी बोरू व कॅमलची शाई यांचा वापर करत होतो. जेव्हा मी सातवीत होतो तेव्हा स्कॅालरशीपच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने मला २० रुपये स्कॅालरशीप मिळाली. या मिळालेल्या पैशातून पहिले एक काम केले ते म्हणजे सव्वा रुपयाचा पेन विकत घेतला त्या अगोदर माझ्याकडे पेन नव्हताच अशाप्रकारे इयत्ता दहावीपर्यंत शेतातून काम करून मिळालेल्या वेळेत अभ्यास चालू होता. दहावीच्या बोर्डाची परिक्षा दिली आणि त्या बोर्डाच्या परिक्षेत त्यावेळी केंद्रात मी पहिला आलो.

प्रश्न – लहनपणी गरीब परीस्थितीमुळे तुम्हला समाजाकडून अपमानास्पद वागणूक मिळाली होती का ?

तात्यासाहेब लहाने :- शाळेत शिकत असताना यश-अपयश,अपमान म्हणजे नेमकं काय हे तेव्हा कळतच नव्हतं,तसा अनुभवच आला नव्हता पण जेव्हा दहावीत गेलो तेव्हा ते चांगल्याच अर्थाने कळाले त्यावेळी शाळेत ‘स्कूल डे’ म्हणजेच मुलांनी एक दिवस मास्तर व्हायचे असा दिवस असे त्यात नववीत परिक्षेत पहिला येणाऱ्या मुलाला हे मास्तर केले जायचे. मी नववीत पहिला आलो होतो म्हणजेच ‘स्कूल डे ’ला मीच हेडमास्तर हे नक्की होते पण माझ्याकडे घालण्यास चागले कपडे नाहीत म्हणून त्यावेळी पाटलाच्या मुलाला हेडमास्तर करण्यात आले. हिच आयुष्यातील पहिली गरिबी परिस्थितीमुळे लागलेली ठेच होती. त्यावेळी खुप वाईट वाटले आणि अपमान कसा असतो हेही कळले मी आईवडिलांना याबद्दल काहीच सांगितले नाही कारण त्यांनी पुन्हा कर्ज काढून कपडे घेतले असते. पण या घटनेने माझी जिद्द वाढली व झपाटून अभ्यास केला व दहावीत मी केंद्रात पहिला आलो.

 

प्रश्न – दहावीत मिळालेल्या परीक्षेतील यशा नंतर तुमच्या पुढील शिक्षणाचा मार्ग कसा पूर्ण झाला ?

तात्यासाहेब लहाने :- दहावी चागल्या मार्क्सनी उत्तीर्ण झाल्यानंतर मी परळीच्या वैद्यनाथ कॉलेजला प्रवेश घेतला. त्या कॉलेजने त्यावर्षी सात विद्यार्थी हे मेडिकलला गेले होते. त्यामुळे कॉलेजने विशेष कोचिंगसाठी २० मुलांची बॅच निवडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कॉलेज मधील दहावीच्या मेरिटमधील २० मुलांना मुलाखतीसाठी बोलावले त्यांची नावे बोर्डावर लावली त्यात पहिले नाव माझे होते मुलाखतीला मला एक प्राणीशास्त्राचे पुस्तक वाचायला दिले. त्यात ‘स्टमक’ हा शब्द मी माझ्या गुरुजींनी शिकवल्याप्रमाणे ‘स्टमच’ असा वाचला त्यामुळे मला उच्चार येत नाही म्हणून मेरिटमध्ये असूनही त्या विशेष कोचिंग २० मुलांच्या बॅचमध्ये प्रवेश दिला नाही इतकेच नाही तर मला पुस्तके व होस्टेलमध्ये राहण्यास नकार देण्यात आला अपमानाचा व अपयशाचा पुन्हा कडू घोट पिण्याशिवाय पर्याय नव्हता पण मी जिद्द सोडली नाही. कॉलेज मधील ‘कमवा व शिका’ या योजने अंतर्गत झाडांना पाणी घालून मिळालेल्या पैशातून अभ्यास केला. ती दोन वर्षे मुलांसह शिक्षकानींही मला ‘स्टमच’ म्हणून चिडवले. अपमानाने मी खचलो नाही तर मी माझ्या ज्ञानात व उच्चारात प्रगती केली. कॉलेजचा निकाल तेव्हा कॉलेजमधून मी एकटाच मेडिकलला गेलो होतो त्या २० जणांच्या बॅचमधून डॉ.किशोर पैलवान हे एकटेच पुढे आले. मला त्यावेळी वाटले मीही त्या बॅचमध्ये असतो तर माझाही प्रवेश झाला नसता. कदाचित....

प्रश्न – हा सर्व प्रवास पाहता तुम्ही तुमचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी आग्रही होता पुढे तुम्हाला कशा प्रकारे अडचणी येत होत्या ?

तात्यासाहेब लहाने :- वैद्यनाथ कॉलेजमध्ये मेडिकल परीक्षेसाठी सुरु केलेल्या विशेष २० मुलांच्या बॅचमध्ये इंग्रजी उच्चार स्पष्ट नसल्याने प्रवेश न मिळाल्याने मी निराश होतो. पण मी विशेष कोचिंगशिवाय स्वतःच अभ्यास करायचे ठरवले. कॉलेजने पुस्तके व होस्टेलमध्ये राहण्यास नकार दिल्याने मी कॉलेजातील ‘कमवा व शिका’ योजने अंतर्गत काम करत होतो त्याचे ३० रुपये मिळत होते त्यातून कसाबसा खर्च निघत असे. मेडिकल प्रवेशाची परीक्षा दिल्यानंतर मी माझ्या घरीच आलो आणि शेतात आई-वडिलांना मदत करू लागलो. मी शिक्षणाच्या या कालावधीत परळीला एका कंडक्टरच्या घरी भाड्याने राहत होतो, त्यांची मुलगी दहावीत शिकत होती मी त्यांना म्हणालो मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे तुम्ही मला इतर काही देऊ नका पण माझ्या शिक्षणासाठी मदत करा ते तयारही झाले माझ्या गावी त्यांनी येण्याचा मुहूर्तदेखील ठरला. मी परळीहून माझ्या गावाकडे १४ किलोमीटर सायकल मारत पोहे घेऊन गेलो बसने जाण्याइतके  पैसे त्यावेळी माझ्याकडे नव्हते. त्या कंडक्टरचे वडील हनुमंतराव पाटील घोड्यावर बसून माझ्या गावी माकेगावला आले. गावातील ओळखीच्या लोकांकडे त्यांनी चहा घेतला.इकडे आम्ही दिवसभर त्यांची वाट बघत होतो पण ते घरी आलेच नाहीत नंतर आम्हाला कळले कि गावातील आमच्या भावकीतील लोकांनीच त्यांना सांगितले कि लहनेंकडे राहायला घर नाही किंवा जास्त शेती नाही कशाला देता तुमची शिकलेली मुलगी मजुरी करायला त्यांच्या घरी? त्यांना हे सगळं खर वाटलं त्यामुळे आमच्या घरी न येताच ते परत निघून गेले.

    मी मेडिकल प्रवेश परीक्षा देऊन गावी शेतात काम करत होतो परीक्षेचा निकाल थोडा उशीरच लागला त्यावेळी निकाल लागण्याचे साधन काहीच नव्हते. ज्या दिवशी निकाल लागला त्याचदिवशी काळे सर हे सायकलवरून आमच्या गावी घरी आले व माझे अभिनंदन करून परिक्षेत दहावा आल्याचे सांगितले पण माझ्या वडिलांना परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण मला देणे जमणार नव्हते यासाठी मलाच काहीतरी करायचे होते जेणेकरून माझे शिक्षण सुरु राहील..

प्रश्न – तुम्ही तुमचे मेडिकलचे शिक्षण कसे पूर्ण केलात? शिक्षण पूर्ण करत असताना कोणत्या अडचणींना समोर गेलात

तात्यासाहेब लहाने :- वैद्यनाथ कॉलेजमधुन मेडिकल प्रवेश परीक्षा दहाव्या क्रमांकाने उतीर्ण झाल्यावर मी औरंगाबादला अंबेजोगाई या मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस ला प्रवेश घेतला या वेळी पैशाची सोय व्हावी यासाठी आम्ही एक जेवणाची मेस सुरु केली. त्यातून मेडिकलच्या शिक्षणाचा खर्च चालू होता. मेडिकलच्या शिक्षणासाठी लागणारी महागडी पुस्तके घेणे परिस्थितीमुळे अवघड होते त्यामुळे मी कॉलेजमधील लायब्ररीमधील पुस्तकेच वाचत होतो. खिश्यात जास्त पैसे नसल्याने मी गावी जास्त जात नव्हतो. मेडिकलला असताना माझ्या एका मित्रानेच मला त्यावेळी कॉलेजचे दोन ड्रेस,अॅप्रान,कोट घेऊन दिले होते. पुढे कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात असताना माझे लग्न झाले माझे सासरे हे त्यावेळी आमदार होते. ते मला माझ्या मेडिकल शिक्षणासाठी मदत करत होते पण अचानक त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या व माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. लग्न ज्या गोष्टीसाठी केले होते ते म्हणजे मला शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत हवी होती तीच आता पूर्णपणे बंद झाली त्यामुळे मला थोडा धक्काच बसला.

   या सर्व घरतील परिस्थितीमुळे माझ्या अभ्यासावर परिणाम झाला आणि मी तिसऱ्या वर्षातील डोळ्यांच्या विषयात नापास झालो. पुढे ती परीक्षा मला सहा महिन्यांनी द्यावी लागली त्यात मी पास झालो. एम.बी.बी.एस पूर्ण झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्यूएट (P.G) करण्याचे ठरवले मला P.G हे हाडांचा डॉक्टर किंवा लहान मुलांचा डॉक्टर व्हायचे होते पण त्यामध्ये अॅडमिशन घेतले असते तर मला कॉलेज कडून पैशाची मदत मिळाली नसती त्यामुळे मी डोळ्यांचा डॉक्टर व्हायचे ठरवले. त्यात मी पासही झालो यावेळी मला लग्न झाल्यामुळे एक मुलगीही झाली होती.

प्रश्न – एक डोळ्यांच्या डॉक्टर म्हणून तुमची ओळख जनसामान्य लोकांपर्यंत कशी निर्माण झाली ?

तात्यासाहेब लहाने :- डोळ्यांच्या विषयांमध्ये मी P.G केल्यानंतर औरंगाबाद येथे अंबेजोगाई या ठीकाणी डोळ्यांचा डॉक्टर म्हणून कारकीर्द सुरु केली. त्यावेळी लोकांचा माझ्याकडे येण्याचा ओढ हा खूप कमी होता. पेशंट खूप कमी असायाचे डोळ्यांच्या समस्या त्या भागातील लोकांमध्ये असायच्या पण त्याचे निदान करण्यासाठी मात्र थोडे लोकयाचे यायचे. याचे कारण मी शोधले तेव्हा मला समजले कि तेथील नंदागाव या ठिकाणी एका व्यक्तीच्या एका डोळ्याच्या ऑपरेशन झाल्यानंतर त्याचा काही कारणाने मृत्यू झाला. त्यामुळे डोळ्याच्या ऑपरेशनबाबत तेथील लोकांमध्ये एक भीती होती आणि मला ती घालवायची होती त्यामुळे मी त्या गावात गेलो.मात्र त्या गावातील लोकांना डोळ्याचा डॉक्टर असल्याचे समजल्यावर त्यांनी दरवाजेच बंद केले. त्यामुळे आम्ही परत आलो. पण मला त्या गावात जाऊन पुन्हा लोकांना समजावयचे होते त्यामुळे मी पुन्हा त्या गावात गेलो तेथे एका बाईच्या डोळ्यांना दिसत नव्हते त्या बाईचे सासरे समजदार होते ऑपरेशनसाठी त्या बाई विरोध करत होत्या त्या म्हणत होत्या कि ऑपरेशन करण्यापेक्ष्या असचं मेलेलं बरं पण आम्ही व त्याच्या सासऱ्यांनी त्यांना समजावलं व मी हॉस्पिटलमध्ये त्यांचे ऑपरेशन करून ४० दिवस ठेवले व नंतर घरी सोडले त्यांना दिसू लागल्याने त्यांची चर्चा संपूर्ण गावा-गावात झाली आणि माझ्याकडे पेशंटची संख्या वाढू लागली. लोकांच्या मनात एक चांगला डॉक्टर म्हणून जागा मिळवली.

प्रश्न – अंबेजोगाई या ठिकाणी अधिव्याख्याता या पदावर गेल्यावर तेथील अनुभव कसे होते?

तात्यासाहेब लहाने :- मी M.S झालो तसेच M.P.S.C ची परीक्षाही पास झालो त्यामुळे अंबेजोगाई येथे अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी तेथे काम करणारे माझे सहयोगी प्राध्यापक जे माझे गुरु होते त्यांनी राजीनामा देऊन लातूरला स्वतःचा खाजगी व्यवसाय सुरु केला होता त्यांचे व माझे पद वेगळे होते तरी एका प्रख्यात दैनिकात अर्धा पान बातमी छापून आली कि डॉ.लहाने यांना रुजू करून घेण्यासाठी अतिशय चांगले नेत्रतज्ञ असलेल्या त्या प्राध्यापकाला काढून टाकले ज्या वार्ताहराने लिहिले होते ते माझ्या कॉलनीत राहत होते ते पेशाने प्राध्यापकही होते मी त्यांना जाऊन भेटलो आणि ती बातमी कशी चुकीची आहे ते मी त्यांना सांगितले त्यावेळी ते मला म्हणाले कि “मला हे माहित आहे पण त्यांना सहानभूती मिळावी व त्यांची खासगी प्रक्टिस व्यवस्थित चालावी म्हणून मी लिहिले”. हे ऐकून मी निःशब्द झालो

    पण या बातमीमुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा संशयाने बघायला लागला. एक वकील आले व मला म्हणाले कि “तुम्ही मला हात न लावता तपासा,तसं मी लातुरलाच त्या सोडलेल्या डॉक्टरकडेच जाणार आहे”. त्यांना मी गोळ्या देऊन डोळ्याची ऑपरेशन ताबोडतोब करण्याचा सल्ला दिला ते लातूरला त्या डॉक्टरकडे गेले व पुन्हा माझ्याकडे आले व म्हणाले “त्यांच्याकडे संबधित मशनरी नाहीत त्यामुळे हे ऑपरेशन तुम्हीच करा” मी सांगितले हात न लावता ऑपरेशन करता येत नाही मग ते म्हणाले “आता तुम्हीच हात लावा व ऑपरेशन ही तुम्हीच करा मी त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केली व जन्मभर त्याची दृष्टी कायम राहिली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अशा घटना माझी परीक्षा बघणाऱ्याच ठरल्या मी त्या परीक्षा उतीर्ण होत गेलो मी मानापमान सहन करत होतोच पण त्यात खचून न जाता प्रयत्न करत होतो

प्रश्न –  तुम्हाला दुसरे जीवनही आईनेच दिले आहे याबद्दल काय सांगाल ?

तात्यासाहेब लहाने :- मी अधिव्याख्याता म्हणून व डोळ्यांचा डॉक्टर म्हणून अंबेजोगाई येथे चांगला रमलो होतो. माझे नाव विचारत रुग्ण येण्यास सुरुवात झाली होती; पण आणखी एक जीवघेणं वळण अचानक समोर येऊन उभं ठाकलं. मे १९९२ मध्ये माझा रक्तदाब २४०-१८० असल्याचे निदान झाले. माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. मला मुंबईला हलविण्यात आले. तपासण्या झाल्या व मला डायलिसीसवर ठेवण्याचा सल्ला दिला गेला. मी १९९४ सालच्या जुलमध्ये औषधोपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात बदली करून घेतली. बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मला आणखी एक-दोन वष्रेच आयुष्य असल्याचे जाहीर केले. वर विमा काढण्याचा सल्ला दिला. मी खूपच खचून गेलो. माझ्या मुलाबाळांचं काय? माझी बायको सुलू, आई-वडील, बहीण-भाऊ, सासू हे सर्वच माझ्यावर अवलंबून होते. त्यांच्यासाठी मी विमा काढला. सुलू व आई-वडील घरात असायचे. मला खोकला आला, की उठून बसायचे, काळजी करायचे. मग मी मोठा तक्क्या घेऊन बसल्या बसल्याच झोप घेत असे, कारण बसल्याने खोकला येत नसे. पुढे डॉक्टरांनी डायलिसिस सुरू केले. दहा आठवडे डायलिसिस झाल्यावर किडनी बदलता येईल, असे सांगितले. घरातील सर्वच जण किडनी देण्यासाठी तयार झाले. सर्वाच्या तपासण्या केल्या. त्यात अंजनाबाईंची म्हणजे माझ्या आईची किडनी सर्वात जास्त मॅच झाली. १२ फेब्रुवारी १९९५ ला माझी शस्त्रक्रिया डॉ. माधव कामत व डॉ. चिवबर यांनी सर जे.जे. रुग्णालयातच केली, कारण माझा तो हट्ट होता. माझी आई तिचा अवयव देऊन डॉक्टरांना म्हणायची, ‘‘माझं सगळं काढून घ्या, पण माझा तात्या वाचला पाहिजे.’’ हे फक्त आईच करू शकते. तिच्या या अफाट प्रेमाने मला पुनर्जन्म मिळाला. माझ्यासाठी हे वळण विधायक ठरलं, कारण मी माझं पुढचं आयुष्य गरिबांची सेवा करण्यात घालविण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न –  अंबेजोगाई नंतर मुंबईचा अनुभव कसा होता ?

तात्यासाहेब लहाने :-  आजारपणामुळे मी अंबेजोगाईतून मुंबईत बदली करून घेतली पण रुग्णांचा माझ्याकडे येण्याचा ओढा तितकासा दिसत नव्हता. या वेळी मी जे.जे.रुग्णालयात काम करत होतो  औरंगाबाद व मुंबईतील  शस्त्रक्रिया पद्धतीत खूपच फरक होता. मी येथील निवासी डॉक्टरांपेक्षा निपुण वाटत नव्हतो. तरी डॉ. रागिणी पारेख यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकविल्या. तरीही रुग्णसंख्या वाढत नव्हती, कारण बाहेर ‘फॅकोइमलशी पिफकेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया होत होत्या. ती शिकण्यासाठी अहमदाबादला गेलो. विभागात १० लाख रुपयांचे फॅकोचे मशीन घेतले, शस्त्रक्रिया सुरू केल्या. तिसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करताना गुंता निर्माण झाला. मी खूप खचलो, परत अंबेजोगाईला जायची तयारी केली; पण डॉ. रागिणी व डॉ. मनोज मला डॉ. केकी मेहतांकडे घेऊन गेले. डॉ. मेहता म्हणाले, उद्या शस्त्रक्रिया ठेवा. मी येतो; पण सर्व निवासी डॉक्टरांना बाहेर ठेवा. मी मात्र निवासी डॉक्टरासमोरच शिकवा म्हणून सांगितले. डॉ. मेहता आले. मला मोठे बळ मिळाले. मी शस्त्रक्रिया सुरू केल्या व १३ शस्त्रक्रिया गुंतागुंत न होता यशस्वी केल्या. त्या दिवसापासून माझी भीती गेली ती कायमची! एक महत्त्वाचा टप्पा पार पडला होता. हे मशीन जे.जे.त आल्याचे कळल्याने रुग्णसंख्येतही खूप वाढ होऊ लागली, ती अगदी आजतागायत चालूच आहे.

प्रश्न –   मुंबईमधील जे.जे.रुग्णालयात काम करत असताना कोणते अनुभव आले आहेत ?

तात्यासाहेब लहाने :- जे.जे. मध्ये नेत्र विभागाचे नाव चांगले झाल्याने रुग्णांची संख्या खूपच वाढली. त्यात अगदी इतर ठिकाणी शस्त्रक्रिया करून त्यात गुंतागुंत झालेले रुग्णही येऊ लागले. पण  अचानक एके दिवशी सकाळी मला फोन आला की, तुमच्या विभागात शस्त्रक्रियेनंतर तीन जणांचे डोळे गेल्याची मोठी बातमी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आलेली आहे. मी पेपर वाचला, तर जे.जे.मध्ये उपचार केल्याने तीन रुग्णांना दृष्टी गमवावी लागली ही  बातमी छापली होती. मला हे कळताच  मी वॉर्डात गेलो, तर कुणाचीही  दृष्टी गेली नव्हती. मग अशी बातमी का आली? याचा शोध घेतल्यावर समजले कि  ठाण्यात शस्त्रक्रिया झालेले व दृष्टी गेलेले तीन रुग्ण रात्री दाखल झाले होते. मी त्यांना तपासले. त्यांच्या शस्त्रक्रियाही रविवारीच केल्या. त्यातील दोघांना दृष्टीही परत मिळाली. मी संबंधित वृत्तपत्र कार्यालयात जाऊन संपादकांना भेटलो. त्यांनी माफी मागितली व  या शस्त्रक्रिया ठाण्यात झाल्यात, जे.जे.त नाही. बातमीचं स्पष्टीकरण वा खुलासा छापला गेला, पण तो सहाव्या पानावर; पण लोकांच्या लक्षात राहिली ती पान एकवरचीच बातमी. साहजिकच रुग्णांवर खूपच परिणाम झाला. रोज सातत्याने प्रयत्न केल्यानंतर तसे काहीही झाले नसण्याची बातमी सगळीकडे पसरली. रुग्णसंख्या पूर्ववत होण्यास थोडेथोडके  नाही तर सहा महिने लागला .

 

प्रश्न –  तुम्हाला तुम्ही केलेल्या सामाजिक कार्यामुळे अनेक पुरस्कार मिळाले या सन्मानानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या ?

तात्यासाहेब लहाने :- समाजात प्रतिष्ठा मिळाल्यानंतर अपमान होत नाहीत किंवा अडचणी येत नाहीत हे काही खरे नव्हे. मला २००८ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच बरोबर अनेक सामाजिक संस्था,कार्यालये यांच्याकडून पुरस्कार मिळाले .मी डोळ्यांचा  डॉक्टर झाल्यावर गरीबांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात कार्य करण्याचा निर्णय घेतला. बाबा आमटे  यांच्यासारख्या समाजसेवेसाठी सुरु केलेल्या ‘आनंदवन’ सारख्या ठिकाणी मी अनेक रुग्णांच्या  शस्त्रक्रिया केल्या  या सामाजिक सेवेमुळे मला समाजात प्रतिष्ठा  मिळत होती पण यावर टीका करणारे ही अनेक होते.

प्रश्न –   मुंबईतील जे.जे सारख्या प्रतिष्ठित रुग्णालयाचे अधिष्ठाता झाल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा आला काय आठवणी आहेत ?

तात्यासाहेब लहाने :- अंबेजोगाई येथे मला अधिव्याख्याता या पदाचा अनुभव होताच पण पुढे जे.जे. रुग्णालयात काम करत होतो याच वेळी माझी निवड जे.जे रुग्णालयाचा अधिष्ठाता म्हणून  माझी निवड झाली. अधिष्ठाता झाल्यानंतरच्या अनुभवांचे तर एक पुस्तक होऊ शकते. या खुर्चीवर बसल्यानंतर चित्रच बदललं. अचानक सगळीकडे प्रेमाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक जण फारच प्रेमाने वागत, नतमस्तक होत. ज्यांना कधी भेटलो नाही तेही लोक दहा जन्मांपासूनचे मित्र असल्यासारखे वागू लागले. त्या सर्वाच्या वागण्यामुळे माझाही सर्वावर विश्वास बसला. इतके मित्र मिळाल्याने मीही फार खूश होतो. प्रत्येकावर माझा विश्वास होता; पण इथेच आणखी एक पराभव माझी वाट बघत होता. माणसांवर ठेवलेल्या विश्वासाचा पराभव होता .

माझ्यावर एक अडचणीचा  प्रसंग आला होता . मागे-पुढे पाहतो तर सुरुवातीला माझ्याबरोबर २४ तास बसणारे, माझ्या नावाने सत्ता वापरणारेच गायब. त्यांचे फोन बंद. मग इतरांचे काय? मी या  परिस्थितीतून निभावलो; पण यातून एक गोष्ट नक्की कळली, की अडचणीवेळी तुमच्याबरोबर तुमचे कुटुंब व तुम्ही एकटे असता. बाकी असतो तो सगळा आभास. अर्थात रुग्णालयाच्या बाहेर मात्र आजही प्रत्येक जण घरच्यासारखं प्रेम करतो. जवळची माणसे अशा वेळीच ओळखता येतात. तुम्ही फक्त चांगलं काम करत राहायचं. लोकांसाठी केलेलं हे काम आणि दुसऱ्यांना मदत करून मिळालेले आशीर्वाद हेच संकटातून मार्ग काढण्यासाठी मदत करत असतात.

     आजवर  मी लाखापेक्ष्या अधिक डोळ्यांची शस्त्रक्रिया केली आहे व त्या रुग्णांची दृष्टी परत मिळाली  आहे त्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी  असल्याने मी आजही सामाजिक कार्ये करत आहे

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक