BREAKING NEWS
HEADLINE NEWS
मोफत आरोग्य तपासणीसाठी मोबाईल हेल्थ युनिट-आदिवासी विकास मंत्री
Posted on: 12-07-2016

गर्जा महाराष्ट्र ऑनलाइन मिडिया, मुंबई


मुंबई, दि. 12 : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील आदिवासी विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी मोबाईल हेल्थ युनिट सुरु करण्‍यासंदर्भात आदिवासी विकास विभाग आणि उर्वी अशोक पिरॅमल फौंडेशन यांच्यात आज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत मोबाईल हेल्थ युनिट संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आदिवासी विकास विभाग आणि उर्वी अशोक पिरॅमल फौंडेशन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी खासदार अशोक नेते, विधानसपरिषद सदस्य रामनाथ मोते, आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, फौंडेशनचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

या मोबाईल हेल्थ युनिटच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये मुलांची उंची, वजन, हिमोग्लोबीन, त्वचा विकार, युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांचे आरोग्यविषयक “डिजीटल माहिती कार्ड” तयार करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये निवड केलेल्या खाजगी डॉक्टरांकडे सुध्दा उपचारांसाठी दाखल करण्यात येणार आहे.

या युनिटसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. या मोबाईल युनिटचे उद्घाटन 15 ऑगस्ट 2016 रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या युनिटमध्ये एक डॉक्टर, नर्स, मानसोपचार तज्ञ यांचा समावेश असून या युनिटच्या माध्यमातून महिन्यातून दोन ते तीन वेळा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक