BREAKING NEWS
HEADLINE NEWS
ऑलिम्पिक इतिहासात सिंधूचा नवा इतिहास
Posted on: 19-08-2016

रिओ : वृत्तसंस्था

 

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यावर दुसऱ्या पदकाची जमापुंजी करणाऱ्याचा मान पी. व्ही. सिंधूने पटकावला. महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारिनने चुरशीच्या लढतीत सिंधूवर अंतिम फेरीत २१-१९, २१-१२, २१-१५ गुणांनी विजय मिळवत सुवर्ण पदकाची कमाई केली. तर सिंधूने रोप्य पदक पटकावत इतिहास रचला. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात सिंधूचा हा इतिहास ‘चंदेरी सिंधू’ नावाने नोंदविला गेला आहे.  

 

सामन्याची सुरवातच मोठ्या चुरशीने झाली. पहिल्या सेटमध्ये सिंधू आणि मारिन यांच्यात अटीतटीची लढत होती. पंधरा गुणांपर्यंत दोघींनी परस्पर दबाव टाकण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मारिना सतत दोन गुणांनी पुढे राहिली. मात्र १७–१७ गुण करून बरोबरी केल्‍यानंतर सिंधुने चमकदार कामगिरी करत २१-१९ गुणांनी पहिला सेट आपल्‍या नावावर केला. 

 

पहिल्या सेटमध्ये मार खाल्यानंतर मात्र, मारिनाने दुसऱ्या सेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. दुसऱ्या सेटची सुरवात झाल्यावर काही क्षणातच ११ -२ चे वर्चस्व करत मारिनाने सिंधूवर दबाव आणला. या सेटमध्ये सिंधू पूर्णपणे पिछाडीवर असल्याने सर्वांच्याच मनात धाकधुक निर्माण झाली होती. पहिल्या सेटमधील तिची आक्रमकता या सेटमध्ये मात्र दिसून येत नव्हती. या सेटमध्ये मारिनाने आपले वर्चस्व राखले आणि २१-१२ गुणांनी दुसरा सेट आपल्या नावावर केला. 

 

दुसऱ्या सेटनंतर सिंधू आणि मरिना बरोबरीत होत्या. प्रत्येकी एक-एक सेटवर कब्जा केल्याने खेळातील चुरस अधिकच वाढली. शेवटचा सेट कोण नावावर करणार आणि इतिहास रचणार, याची उत्सुक्ता ताणली गेली होती. क्रीडांगणात दोन्ही बाजूच्या समर्थकांनी जोरदार समर्थन सुरू केले होते, तर मैदानात दोन्ही खेळाडूंची परस्पर वर्चस्वासाठी झुंज सुरू होती.

दुसऱ्या सेटमधील पराभवानंतर तिसऱ्या सेटमध्ये मरिनाचे सुरवातीला वर्चस्व कायम होते.  ८-४ ने मरिनाने खेळात आघाडी घेतली होती. अशी खेळाची आवस्था असताना पुन्हा सिंधूने खेळात कमबॅक करत ९ गुणांची कमाई करत १०-९ अशी चुरस निर्माण केली. खेळाच्या एका वळणावर १०-१० अशी बरोबरी झाली आणि खेळ अधिकच चुरशीचा बनला. खेळात पुन्हा १५ गुणांनी मरिनाने आघाडी घेतली. यावेळीची परिस्थिती १५-११ अशी होती. कोणत्याही परिस्थितीत सिंधूला खेळात आघाडी करून द्यायची नाही, असाच मरिनाने पवित्रा घेतला होता. तिचा हा मनसुबा अखेरच्या क्षणापर्यंत यशस्वी ठरला आणि २१-१५ गुणांनी तिसरा सेट आपल्या ताब्यात घेत मरियाने सुवर्ण पदक जिंकले. 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक