BREAKING NEWS
HEADLINE NEWS
पंतप्रधानांच्या हस्ते निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान
Posted on: 24-01-2017

नवी दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला यंदाचा (वर्ष 2016) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            पंतप्रधान यांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी आयोजित शानदार कार्यक्रमात  12 मुली आणि १३ मुले अशा एकूण २५ बालकांना ‘वर्ष २०१६च्या राष्ट्रीय बाल शौर्य’ पुरस्काराचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यातील ४ बालकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यावेळी उपस्थित होत्या. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

            याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित बालकांना संबोधित केले. ते म्हणाले, पुरस्कार प्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचले. या बालकांच्या आयुष्यातील ही उत्तम सुरुवात असून त्यांनी देशासाठी उत्तमोत्तम काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नेताजींच्या योगदानाबाबतही पंतप्रधानांनी बालकांना मार्गदर्शन केले. महापुरूष आणि खेळाडुंच्या आत्मचरित्राचे वाचन करून त्यांच्या कार्याचा अंगीकार करा असे आवाहन त्यांनी, पुरस्कार विजेत्या बालकांसह देशातील बालकांना केले. मनेका गांधी यांनीही उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले.

 जळगाव जिल्हयातील निशा पाटील हीला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. प्रसंगावधान आणि धाडस दाखवून निशा पाटीलने 6 महीन्याच्या चिमुरडीला आगीच्या विळख्यातून वाचविले होते. निशाच्या या कामगिरीची नोंद घेऊन तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनात ही बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कार प्राप्त बालकांनी याआधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह  अन्य गणमान्य व्यक्तींची  भेट घेतली आहे.         

भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणा-या 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बाल कल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाआधी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बाल कल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक