BREAKING NEWS
HEADLINE NEWS
उकडीचे मोदक
Posted on: 31-01-2017

साहित्य:
१ मोठा नारळ
किसलेला गूळ
२ कप तांदूळाचे पिठ
वेलचीपूड
मिठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप

कृती:
१) सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा. (उदाहरणार्थ २ वाटीभर नारळाचा चव त्यासाठी १ वाटी किसलेला गूळ).पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
२) आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावे, काहीवेळा कालथ्याच्या अग्रभागाने मिक्स केल्यास पिठाचे गोळे राहतात. मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
४) उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
५) जर मोदकपात्र उपलब्ध असेल तर पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढावी.
६) जर मोदकपात्र उपलब्ध नसेल तर मोदकांना वाफवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात ३-४ भांडी पाणी उकळावे. मोठे भोक असलेल्या स्टीलच्या किंवा अल्युमिनीयमच्या चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. एकावर एक मोदक ठेवू नयेत. त्यामुळे मोदक फुटण्याचा संभव असतो. जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून १२-१५ मिनीटे वाफ काढावी.
टीप:
१) आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकतो.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक