BREAKING NEWS
HEADLINE NEWS
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचा झंझावात
Posted on: 21-02-2017

ठाणे,

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास उरले असताना रविवारी अवघे ठाणे शहर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमले. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शोच्या झंझावाताने ठाण्यातील वातावरण ढवळून काढले. प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रचारमोहिमेचा कळसाध्याय आदित्य ठाकरे यांच्या या रोड शोने साधला गेला.

आनंद नगर चेक नाक्यापासून सुरू झालेला हा भगवा झंझावात मॉडेला नाका, महाराष्ट्र नगर, किसन नगर नं ३, तीन हात नाका, श्रीनगर पुलिस चौकी, शांती नगर,वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, नितिन कंपनी, सिद्धेश्वर तलाव, ठाणे महानगरपालिका, आराधना सिनेमा,विष्णुनगर, गावदेवी, स्टेशन रोड ठाणे, एनकेटी कॉलेज मार्गे टेंभी नाका येथे संपन्न झाला. ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, नरेश म्हस्के, महापौर संजय मोरे, प्रकाश शिंदे, जयश्री फाटक, सुखदा मोरे, विकास रेपाळे आदी उमेदवार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते

शिवसेनेच्या या रोड शोमुळे ठाण्याच्या रस्त्यांवर रविवारी भगवा जल्लोष अवतरला होता. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि त्यांच्या युवा सैनिकांनी ठाण्याचे वातावरण दणाणून सोडले होते. खांद्यावर शिवसेनेचा भगवा आणि हातात सेल्फी स्टिक घेतलेली तरुणाई जागोजाग दिसत होती. फटाक्यांच्या दणदणाटात आणि ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी जय शिवाजी’ आदी घोषणांनी ठाण्यामध्ये आज भगवे वादळ घोंघावत होते. ठाण्यातील रस्ते शिवसेनेच्या बाइकस्वारांनी फुलून गेले होते. नऊ वारी साड्या नेसलेल्या मराठमोळ्या तरुणीही या बाइकच्या ताफ्यात सहभागी झाल्या होत्या. ठाण्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या या रोड शोचे ठाणेकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ठाण्याच्या रस्त्यारस्त्यांवर शिवसेनेची भगवी लाट उफाळुन आलेली दिसली.

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक