BREAKING NEWS
HEADLINE NEWS
महापौर व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरूषांमध्ये पश्चिम रेल्वे महिलांमध्ये हुपर्स विजयी
Posted on: 21-02-2017

नवी मुंबई, साईनाथ बोईर

नवी मुंबई महानगरपालिका वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असून यामधून नवी मुंबईतील खेळाडूंना स्वत:मधील क्षमता सिध्द करता येतात शिवाय इतर गुणवान खेळाडूंचा खेळ पाहून बरेच काही शिकताही येते असे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी या नामांकीत निमंत्रित संघांच्या महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविणारा संघ नवी मुंबईतील आहे हे या स्पर्धेचे यश असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ जिमखाना येथे 18 ते 20फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालेल्या "नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धा" पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिताचे सभापती श्री. लिलाधर नाईक,नगरसेवक श्री. गिरीश म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, नवी मुंबई व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव श्री.धनंजय वनमाळी, नेरूळ जिमखान्याचे चेअरमन श्री. विनू रैना, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच श्री. अजित रानडे, ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. किरण स्टॅनली, राष्ट्रीय पंच श्री. बाबू आचरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या तीन दिवस चाललेल्या निमंत्रितांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरूष गटात 13 नामांकित संघ सहभागी झाले असून पुरूष गटातील अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात 5 पैकी 3सेट जिंकत पश्चिम रेल्वे संघाने ए.आर.स्पोर्टस् कांदिवली यांच्यावर मात करीत विजेतेपदाचा चषक 35 हजार पारितोषिक रक्कमेसह पटकाविला. नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असो. या संघाने तृतीय तसेच वेदावित स्पोर्टस् क्लब या संघाने चतुर्थ क्रमांक संपादन केला. पश्चिम रेल्वेचा व्हॉलीबॉलपटू जुबीन याला मालिकावीर (मॅन ऑफ द सिरीज) तसेच ए.आर.स्पोर्टस् क्लबचा व्हॉलीबॉलपटू कल्पेश याला अंतिम सामनावीर (मॅन ऑफ द फायनल मॅच)किताबाने सन्मानीत करण्यात आले.

त्याचप्रमाणे महिला गटात 9 नामांकित संघ सहभागी झाले असून हुपर्स, मुंबई या महिला संघाने अंतिम सामन्यात आंध्रा महासभा, माटुंगा या संघावर विजय मिळवित विजेतेपद पटकाविले. ए.आर.स्पोर्टस् क्लब,कांदिवली यांनी तृतीय क्रमांक तसेच वेदावित स्पोर्टस् क्लब यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. महिला गटात हुपर्स मुंबईची व्हॉलीबॉलपटू मल्लिका हिस मालिकावीर (वुमन ऑफ द सिरीज) तसेच आंध्रा महासभेची व्हॉलीबॉलपटू भाग्यश्री हिला अंतिम सामनावीर (वुमन ऑफ द फायनल मॅच)किताबाने सन्मानीत करण्यात आले.

भारत देशाचे प्रतिनिधित्व करणा-या अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरूष, महिला खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने गाजविलेल्या या तीन दिवसीय स्पर्धेतील अनेक सामने चुरशीचे झाले. यावेळी पारितेषिकप्राप्त संघ व खेळाडूंना आकर्षक स्मृतीचिन्हे वितरित करण्यात आली.नवी मुंबई महानगरपालिका ई-गव्हर्नन्सच्या दृष्टीने सकारात्मक वाटचाल करीत असून एकूण 2 लक्ष 22 हजार इतकी पारितोषिक रक्कम विजेत्या संघांच्या व खेळाडूंच्या बँक खात्यात आरटीजीएस प्रणालीव्दारे जमा होणार आहे.या स्पर्धेतील नामांकीत खेळाडूंचा खेळ अनुभवण्यासाठी व्हॉलीबॉल रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.  

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक