BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नवी मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे निकाल जाहिर
Posted on: 27-02-2017

प्रतिनिधी, नवी मुंबई

नवी मुंबईतील मुलांमध्ये व तरुणांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असून या गुणवत्तेला वाव देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध स्पर्धा आयोजनातून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असून खेळांच्या वाढीसाठी आम्ही कटीबध्द आहोत अशा शब्दात उपस्थितांशी सुसंवाद साधत नवी मुंबईचे महापौर श्री.सुधाकर सोनवणे यांनी नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरात खो-खो सारख्या देशी खेळाची लोकप्रियता वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 24 ते 26 फेब्रुवारी 2017 या कालावधीत कोपरखैरणे सेक्टर 8 येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या 'नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा' पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर महापौरांसमवेत स्पर्धा निमंत्रक तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. लिलाधर नाईक, नगरसेविका सौ. लता मढवी, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, उपाध्यक्ष श्री.पी.जी.शिंदे, विश्वस्त श्री. जनार्दन शेळके, पंचमंडळ सचिव श्री. प्रशांत पाटणकर, महापालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव तसेच श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव श्री. सुरेश नाईक, समन्वयक श्री. म्हात्रे, प्राचार्य श्री. प्रताप महाडिक व श्री. सुधीर थळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दि.24 ते 26 फेब्रुवारी 2017 या कालावधीत संपन्न झालेल्या या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील गाजलेल्या खेळाडूंचा समावेश असलेले पुरुषांचे 12 व महिलांचे 12 नामांकीत संघ सहभागी झाले होते.

पुरुष गटात विहंग क्रीडा मंडळ यांनी ग्रिफीन जिमखाना यांच्याशी झालेल्या चुरशीच्या लढतीत त्यांच्यावर एका गुणाने मात करीत विजेते पदाचा नवी मुंबई महापौर चषक (पुरुष गट) पटकाविला. महात्मा गांधी स्पोर्टस् क्लब मुंबई उपनगर हा संघ तृतीय तसेच स्व.अरूणभैय्या नायकवडी युवा मंच वाळवा सांगली हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. विहंग क्रीडा मंडळाच्या प्रदिप जाधव यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हा बहुमान लाभला तसेच विहंग क्रीडा मंडळाचेच गजानन शेंगाळ सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू आणि ग्रिफीन जिमखान्याचे निखील वाघे सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले.

महिला गटात शिवभक्त विद्यामंदीर बदलापूर ठाणे यांनी रा.फ.नाईक कोपरखैरणे नवी मुंबई यांच्यावर मात करीत विजेते पदाचा नवी मुंबई महापौर चषक (महिला गट) संपादन केला. छत्रपती क्रीडा मंडळ उस्मानाबाद हा संघ तृतीय तसेच आर्यन स्पोर्ट्स क्लब रत्नागिरी हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवभक्त विद्यामंदीर बदलापूर ठाणे या संघातील रेश्मा राठोड हिला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हा बहुमान लाभला तसेच रा.फ.नाईक कोपरखैरणे यांच्या संघातील प्रणाली मगर ही सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू आणि शिवभक्त विद्यामंदिर बदलापूर ठाणे संघातील प्रियंका भोपी ही सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली.

दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी 24फेब्रुवारीला पुरुष गटात महात्मा गांधी स्पोर्टस् असोसिएशन मुंबई उपनगरचा खेळाडू सौरभ चव्हाण तसेच महिला गटात आर्यन स्पोर्टस् क्लब रत्नागिरीची खेळाडू तन्वी कांबळे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे 25 फेब्रुवारीला पुरुष गटात श्री सह्याद्री संघ मुंबई उपनगरचा खेळाडू दुर्वेश साळुंखे आणि महिला गटात छत्रपती क्रीडा मंडळ उस्मानाबादची खेळाडू ऋतुजा खरे ही दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या महिला व पुरुष गटातील अंतिम सामन्याचे थेट(लाईव्ह) प्रक्षेपण यू-ट्युब चॅनलवरून सर्वदूरच्या प्रेक्षकांनी अनुभवले. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहयोगाने यशस्वी रितीने तीन दिवस संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला क्रीडा रसिकांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून राज्यभरातून आलेल्या खो-खो पट्टूंचा उत्साह वाढविला.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक