BREAKING NEWS
HEADLINE NEWS
सरकार अजून किती शेतकरी आत्महत्यांची वाट पाहणार ? – अजित पवार
Posted on: 18-04-2017

ऑनलाईन मिडिया, नाशिक

डोक्यावरील कर्जाच्या ओझ्याखाली राज्यातील हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु अद्यापही हे सरकार शेतकरी आत्महत्यांकडे गांभीर्याने पहायला तयार नाही. अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट पाहत आहे ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांनी मालेगाव येथे संघर्षयात्रे दरम्यान बोलताना सरकारला केला. 

दरम्यान मालेगाव तालुक्यातील‘वाके’गावातील तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आ.अजित पवार यांच्यासह संघर्षयात्रेत सहभागी नेत्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

आजच्या संघर्षयात्रे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील नामपूर व सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पवार म्हणाले राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आज राज्यातील शेतकरी अडचणीत सापडलाय, कर्जाच्या जाचाला कंटाळून तरुण शेतकरी आत्महत्या करत आहेत यापेक्षा दुसरी दुःखद गोष्ट असू शकत नाही. नाशिक जिल्ह्यात कांद्याला आज भाव नाही. अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति किलो फक्त १ रुपये अनुदान दिले जाते ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. 

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे एकदा कर्जमाफ करावे आणि त्यांनी पिकवलेल्या कृषीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा परत आमचा शेतकरी सरकारकडे कर्जमाफी मागणार नाही. एकीकडे उद्योगपतींचे करोडो रुपयांचे कर्ज माफ केले जाते पण सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही. हे सरकार राज्यातील सहकार क्षेत्र, बाजार समित्या मोडीत काढण्यास निघाले आहे. सत्तेच्या जोरावर आपले बगलबच्चे प्रशासक म्हणून बाजार समित्यांवर नेमले जात आहेत, पण यांचा हा डाव उलथून टाकायला हवा. सरकार विरोधातील या लढ्याला एकमताने पाठिंबा द्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले सरकारने नुकतीच जिल्हा बँकाकडून १ लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविल्याची माहिती माध्यमातून येत आहे. परंतु केवळ १ लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन भागणार नाही तर राज्यातील सरसकट शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्जमाफ झाले पाहिजे. परंतु सरकार केवळ १ लाखांपर्यंतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी खा.अशोक चव्हाण यांनी केला.

या संघर्षयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी, शेकापचे नेते प्रवीण गायकवाड,  आ.शशिकांत शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.राजेश टोपे, आ.अब्दुल सत्तार, आ सुनील केदार, आ. सुमन पाटील, आ.दिपिका चव्हाण, आ. विद्याताई चव्हाण, आ.यशोमती ठाकूर, आ.प्रदीप नाईक , आ.जयकुमार गोरे, आ.ख्वाजा बेग, आ.प्रकाश गजभिये, आ.हणमंत डोळस, यांच्यासह  पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी  झाले होते.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक