BREAKING NEWS
HEADLINE NEWS
लातूरसाठी तीन नव्या अतिरिक्त रेल्वे
Posted on: 09-05-2017

ऑनलाईन मिडिया, नवी दिल्ली

लातूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या सुविधेसाठी लातूरकरिता तीन नव्या अतिरिक्त रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे. लातूर एक्सप्रेसला कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीत केल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती, त्यावर मार्ग काढावा यासाठी आज पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.

तीन नव्या रेल्वे सेवा- बिदर ते मुंबई लातूर आणि उस्मानाबाद मार्गे- ही रेल्वेसेवा १ जुलैपासून सुरु होणार आहे. यशवंतपूर-बिदर एक्सप्रेसला लातूरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पुढील ३-४ आठवड्यात कार्यवाही होणारअसून लातूर रोड ते गुलबर्गा हा नवीन मार्ग डिसेंबरनंतर सुरु होणार आहे.

लातूर एक्सप्रेसला बिदरपर्यंत वाढविण्यात आल्याने त्यास विरोध म्हणून लातूर परिसरातील रेल्वे प्रवाशांनी 4 मेपासून बंद पुकारला होता. पालकमंत्री निलंगेकर पाटील यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना असुविधा निर्माण होऊ नये यासाठी विविध पर्यायांवर चर्चा केली.

लातूर एक्सप्रेसमुळे निर्माण झालेल्या समस्येतून चांगली रेल्वेसेवा लातूरकरांना उपलब्ध झाल्याचे पालकमंत्री श्री. निलंगेकर पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी लातूरकर प्रवाशांच्या निर्माण झालेल्या समस्यांसंबंधी रेल्वेमंत्री प्रभू यांचेशी चर्चा केली असून लातूर एक्सप्रेसला बिदरपर्यंत जरी पुढे वाढवले असले तरी लातूरकरांच्या कोट्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे सांगून तीन नव्या रेल्वे सेवा लातूरकरांसाठी देत असल्याचे रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.

लातूररोड ते गुलबर्गा मार्गाचे सर्वेक्षण सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले जाऊन या वर्षाच्या अखेरीस त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी आंदोलन मागे घेऊन नव्या रेल्वे सेवांचे स्वागत करण्याचे आवाहनही रेल्वेमंत्र्यांनी केले आहे.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक