BREAKING NEWS
HEADLINE NEWS
लोणावळाच्या विकासासाठी भरीव निधी देऊ– मुख्यमंत्री
Posted on: 02-06-2017

ऑनलाईन मिडिया, पुणे

पर्यटनदृष्ट्या लोणावळा शहराचा नावलौकिक संपूर्ण देशभर आहे. या ठिकाणी येणाऱ्यांना लोणावळ्याची वेगळी ओळख व्हावी, त्यांना सोयी-सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नगरपरिषद नेहमी प्रयत्नशील असावी.  शहराच्या विकासासाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

लोणावळा नगर परिषदेने सुमारे 32 कोटी रूपये खर्चुन बांधलेल्या सर्वसोयीयुक्त नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  झाले, त्यावेळी ते बोलत होते.    

यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार संजय भेगडे,  नगराध्यक्षा  सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, खासदार श्रीरंग बारणे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, लोणावळा शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. लोणावळ्याची ही परंपरा टिकविण्यासाठी आणि पर्यटकांनी जास्तीत जास्त आकृष्ट व्हावे, यासाठी लोणावळा नगरपरिषदेला निधीची कमतरता पडू देणार नाही.

लोणावळा येथे बहुमजली वाहनतळ उभारणे, रुग्णालयाला निधी देणे, खंडाळा तलाव आणि रोपवे विकसित करणे, या योजनांना नगरविकास विभागाच्या मदतीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. लोणावळ्याच्या घनकचऱ्याचे एका वर्षात विलिगीकरण व्हायला हवे, तसेच त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया व्हायला हवी, त्यासाठी आधुनिक पध्दतीने नगर परिषदेने आराखडा तयार करावा, असे ते यावेळी म्हणाले.

या नवीन प्रशासकीय इमारतीतून प्रशासनात गतीमानता यावी. नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. लोकांचे कुठलेही काम अडू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यातील शहरे विकासाची इंजिन आहेत. त्यामुळे शहरांचा विकास व्हावा असे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी म्हणून विविध शहरांना राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात 21 हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढेही निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नगराध्यक्ष जाधव यांनी प्रास्ताविक तर उपनगराध्यक्ष चौधरी यांनी आभार मानले.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक