BREAKING NEWS
HEADLINE NEWS
युपीएससीत प्रथम आलेल्या विश्वांजली गायकवाडचे शिक्षणमंत्र्यांनी केले अभिनंदन
Posted on: 02-06-2017

ऑनलाईन मिडिया, पुणे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्टातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या आणि देशातून ११ वी आलेल्या विश्वांजली मुरलीधर गायकवाड या विद्यार्थीनीचा सत्कार  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुणे येथे केला. महाराष्ट्र सरकार तर्फे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन श्री. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी करण्यात येते. यंदाही या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन महाराष्ट्र सदनात करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा लाभ विश्वांजली गायकवाड या विद्यार्थीनीने घेतला. या प्रशिक्षण वर्गा बद्दल विश्वांजलीने श्री. तावडे यांच्याशी बोलताना समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या प्रशिक्षण वर्गामध्ये कोणत्या अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, याची चर्चाही श्री. तावडे यांनी विश्वांजलीशी केली. यावेळी विश्वांजलीचे आई-वडील सुध्दा उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावरील भारतीय प्रशासकीय सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांसाठी  प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रशासनातील प्रतिनिधित्व वाढावे ,त्यांच्यातील वैयक्तिक त्रृटी दूर करणे, सामाजिक विषयांना अदयावत करणे तथा युपीएससी च्या मुलाखतीकरीता आत्मविश्वास वाढवणे यासाठी उमेदवारांना गुणात्मक प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांचे पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागामार्फत मागील ३ वर्षापासून दिल्ली येथे अभिरुप मुलाखत क्षमता वृध्दी  उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत शेकडो उमेदवाराना मुलाखती बरोबरच तज्ञाकडून आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले, याचा विद्यार्थ्यांना मुख्य मुलाखती करीता मोठा फायदा झाला. युपीएसची च्या निकालात महाराष्ट्रातील ४९ विद्यार्थी यशस्वी झाले.

सन २०१६-१७ करिता दिनांक २५ मार्च, २०१७ ते ३० एप्रिल, २०१७ पर्यंत येणाऱ्या प्रत्येक शनिवार व रविवारी जुने महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे अभिरुप मुलाखत कार्यक्रम उमेदवारांकरीता राबविण्यात आला . प्रत्येक दिवशी सरासरी १५ ते २० विद्यार्थ्यांच्या अभिरुप मुलाखती घेण्यात आल्या. असे एकूण ११ दिवस चाललेल्या व १७ पॅनल्सने १३६ उमेदवारांची अभिरुप मुलाखत अनुभवी व तज्ञांमार्फत घेऊन उमेदवाराना मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी तज्ञ म्हणून एकूण ४४ मान्यवरांचा सहभाग लाभला ज्यात प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त राजदूत (आय एफ एस), केंद्रीय व स्थानिक दिल्ली प्रशासनातील सनदी अधिकारी  तसेच शैक्षणिक , उद्योग,पत्रकारीता , सामाजिक सेवा व बहूराष्ट्रीय कंपनी इ. क्षेत्रातील उच्च पदस्थ व अनुभवी मान्यवरांचा समावेश होता.

या प्रशिक्षण वर्गामध्ये डॉ. श्रीकर परदेशी  (आय ए एस) व श्री.सदानंद दाते (आपीएस) यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले त्यांनी अनेक वेळा विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. विद्यार्थ्यांनी देखील मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. त्याचप्रमाणे मा.आनंद पाटील सर (आय ए एस) व इतर प्रशासकीय सनदी अधिकाऱ्यानी त्यांच्या उपलब्ध वेळे नुसार नवीन /जुन्या सदनात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रत्येक विद्यार्थ्यांकडून अभिरुप मुलाखतीनंतर फिडबॅक घेण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यांने संबधित पॅनल तथा अभिरुप मुलाखतीच्या नियोजनाबाबत अतिशय उत्तम प्रतिसाद नोंदविला. तसेच पॅनलने विचारलेल्या प्रश्नापैकी बरेच प्रश्न युपीएससी च्या मुख्य मुलाखतीत विचारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एकंदरीत  विद्यार्थ्यांचा प्रतिसाद व त्यांना लाभलेले अनुभवी व तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन याबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

सदर उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वतीने जूने व नविन महाराष्ट्र सदनात शासकीय दरावर मुलाखतीस   येणा-या प्रत्येक उमेदवारास सात दिवसांकरिता निवास व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या हिताचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यास महाराष्ट्र राज्य शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग नेहमीच अग्रेसर असतो. मा. मंत्री महोदय व त्यांचे कार्यालयातील अधिकारी  व कर्मचारी यांनी या उपक्रमाला प्राधान्य देऊन प्रोत्साहीत केले.

याकरीता समन्वयक म्हणून डॉ. प्रमोद क. लाखे संचालक भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्था तथा विभाग प्रमुख (अर्थशास्त्र ) वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर व सहसमन्वयक म्हणून श्री. बी. एम. तराळ ग्रंथपाल, एस आय ए सी मुंबई व श्री.रमेश डामसे सिडनहॅम व्यवस्थापनीय व उद्योजक शिक्षण व संशोधन संस्था, मुंबई यांचेकडे या उपक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक