BREAKING NEWS
HEADLINE NEWS
५ जुन जागतिक पर्यावरण दिवस....
Posted on: 05-06-2017

५ जुन हा जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा केला जातो. जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. जागतिक पर्यावरण दिवस संकल्पना ही बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण याविषयीची आहे.

जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या पद्धती साजरा करता येऊ शकेल. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन (CFC)वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे. सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.

 

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.

 

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.

 

पर्यावरण शिक्षण

यात पर्यावरणाविषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करते. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये ठरविण्यात आली.

पर्यावरण शिक्षण सद्य स्वरूप

बिलिसी (Tbilisi) येथे भरलेल्या पर्यावरणविषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची खालील तत्त्वे निश्चित करण्यात आली-

१)    पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हावा.

२)    पर्यावरण शिक्षण ही एक जीवनभर चालणारी शिक्षणप्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा.

३)    अध्ययनकर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी.

४)    पर्यावरण शिक्षणाचा उपागम (Approach) आंतर विद्याशास्त्रीय असावा. त्यातून विद्यार्थ्यांचा पर्यावरणविषयक एकसंध व संतुलित दृष्टिकोन निर्माण व्हावा.

५)    वास्तव जीवनाशी निगडित समस्या याच पर्यावरण शिक्षणाच्या केंद्रस्थानी असाव्यात.

६)    पर्यावरणविषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्यनिर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावीत.

७)    प्रमुख पर्यावरणीय प्रश्नाची उकल स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून करावी.

आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१८ डिसेंबर २००३) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखडय़ात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठय़क्रम ठरविण्यात आले आहेत.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक