BREAKING NEWS
HEADLINE NEWS
वटपोर्णिमा.....एक पवित्र अस व्रत
Posted on: 07-06-2017

प्रत्येक विवाहित महिलेला वटपोर्णिमा हा सण अगदी पवित्र वाटत असतो. आणि याच महत्त्व  सुध्दा तेवढच असतं. मग ती स्त्री जुन्या काळातील असो अथवा २१ व्या शतकातील...या सणाचं पावित्र्य कमी होत आहे असे कुठेच दिसत नाही.

प्रत्येक विवाहित महिलेच्या आयुष्यात वटपौर्णिमा सणाचे एक वेगळेच महत्त्व असते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रत्येक स्त्री या दिवशी वटवृक्षाची पूजा करते. वटवृक्षाला संस्कृतमध्ये ‘अक्षयवृक्ष’ असे म्हटले जाते. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘क्षय’ म्हणजे विनाश! ज्याचा कधीही विनाश होत नाही अर्थात जो पुन्हा जिवंत होतो, वाढत जातो तो अक्षय वृक्ष म्हणजेच वटवृक्ष! येत्या ८ आणि ९ तारखेला वटपौर्णिमा आहे. स्वाभाविकच त्या दिवशी सर्व लग्न झालेल्या स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतील.

वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.पर्यावरण शास्त्र दृष्ट्या वडाचे महत्व विशेष आहे.जमिनीची धूप थांबवून मातीचे रक्षण करणे, लाकूडफाटा मिळणे, प्राणवायू मिळणे असे वडाच्या झाडाचे अनेक गुणधर्म आहेत.त्यामुळे त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

 

वडाचे झाड

वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

 

वडाची पूजा

वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व - वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत- फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.

 

प्रार्थना-

सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रिय भाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दु:ख संसार सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक