BREAKING NEWS
HEADLINE NEWS
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम तयार करणार
Posted on: 13-06-2017

ऑनलाईन मिडिया, नाशिक

राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग कॉलेज मधून डिप्लोमा कोर्स करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास योजनेंमधून टाटा कन्सलटन्सी व शिर्डी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिशिंग स्कूल सारखा अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देश राज्याचे कौशल्य  विकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यासाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत सर्टिफिकेट कोर्स सुरु करावा याबाबत नुकतीच राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. सदर बैठकीस आमदार जयवंतराव जाधव, शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, कौशल्य विकासचे आयुक्त ई. रविंद्रन, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक अनिल जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शैलेश कुटे, संजय खैरणार आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत महाराष्ट्रातील सर्व हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग कॉलेज मधून डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना तुटपुंज्या पुस्तकी ज्ञानामुळे कोणत्याही चांगल्या हॉटेल मध्ये काम करण्याची संधी मिळत नसल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा व चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी राज्याच्या कौशल्य विकास योजनेंमधून टाटा कन्सलटन्सी व शिर्डी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सहा महिन्यांचा किंवा १ वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करावा अशी जाधव यांनी मागणी केली. त्यासाठी श्री.साईबाबा संस्थान शिर्डी येथे सुमारे २०० पेक्षा अधिक हॉटेल असून संस्थानची स्वतःची निवास व्यवस्था असल्याने  विद्यार्थ्यांची सोय करण्याची क्षमता आहे. तसेच टाटा कन्सलटन्सी हा एक नामांकित ब्रँड असून त्यांच्यामार्फत कौशल्य विकासाचे धडे आणि मुलांना नोकरीस प्राधान्य देणे शक्य असल्याचे सांगितले. त्यावर राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी टाटा कन्सलटन्सी व शिर्डी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच सदरचा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा असे निर्देश दिले.

नाशिक शहरात प्रायोगिक तत्वावर ट्राफिक वार्डनची योजना राबविणार – डॉ.रणजीत पाटील

नाशिक शहरात वाढत्या रहदारीचे नियोजन करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत ट्राफिक वार्डनची योजना प्रायोगिक तत्वावर राबविणार असून ट्राफिक वार्डनसाठी गृह विभागाकडून नियमावली तयार करण्याचे निर्देश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिले. होमगार्डच्या धर्तीवर नाशिक शहरात ट्राफिक वार्डन (वाहतूक मदतनीस) योजना राबविण्यात यावी याबाबत मंत्रालयात डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आमदार जयवंतराव जाधव, अतिरिक्त पोलीस महासंचालक (परिवहन) आर.के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त (परिवहन) अमिताभ कुमार, अतिरिक्त महामार्ग पोलीस आयुक्त विजय पाटील, महाराष्ट्र ट्राफिक वार्डन असोसिएशनचे समन्वयक संतोष शेलार आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत राज्यामध्ये ठाणे व नांदेड इत्यादी शहरांमध्ये ट्राफिक वार्डन हे मासिक मानधनावर वाहतूक पोलिसांना मदतीचे काम करत आहेत. नाशिक शहरात सुद्धा दि.५ सप्टेंबर २०१४ रोजी पोलीस महासंचालकांच्या हस्ते ओळखपत्र वितरीत करून ट्राफिक वार्डन योजना सुरु केली होती. त्यांना ट्राफिकचे नियम आणि कायदेविषयक माहितीचे ९० दिवसांचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेले होते. मात्र २००९ नतंर ही योजना शहरात बंद करण्यात आली असल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच नाशिक शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या व वेगाने वाढणारी वाहनांची संख्या याचा विचार करून, वाहतुकीच्या नियमनासाठी ट्रफिक वार्डनची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले की, अमृत शहर अभियान आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असणाऱ्या सर्व शहरामध्ये ट्राफिक वार्डनची सेवा देता येणे शक्य आहे. त्यासाठी गृह विभागाकडून नियमावली तयार करण्यात येईल. तत्पूर्वी नाशिक शहरात प्रायोगिक तत्वावर ट्राफिक वार्डनची योजना राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले. 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक