BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित
Posted on: 15-06-2017

ऑनलाईन मिडिया, आंबोली

वर्षा पर्यटनासाठी आंबोली सज्ज झाली आहे. गेले काही तासांतील संततधार पावसामुळे वर्षा पर्यटनाचा मुख्य स्रोत असलेल्या आंबोलीचा धबधबा वाहू लागला आहे. येत्या रविवारपासून (ता.18) पर्यटकांचा ओघ सुरू होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

आंबोलीत बारमाही पर्यटन असलेतरी वर्षा पर्यटनाचा हंगाम सगळ्यात मोठा मानला जातो. साधारण दीड ते दोन महिने चालणाऱ्या या हंगामात हजारो पर्यटक भेट देतात. विशेषतः सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. या हंगामाची चाहूल आजपासून लागली आहे. येथे गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली; मात्र त्याला फारसा जोर नव्हता. रविवारी (ता. 11) रात्रीपासून दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आज येथील मुख्य धबधबा प्रवाहित झाला.

गेल्यावर्षी येथे साधारण 14 जूनला पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर हळूहळू पर्यटन बहरत गेले. गेल्या वर्षी वर्षा पर्यटनासाठी विक्रमी गर्दी झाली होती. यंदा तुलनेत वेळेवर हंगाम सुरू होत असला तरी श्रावण महिना लवकर सुरू होणार आहे. श्रावणाआधीच खऱ्या अर्थाने वर्षा पर्यटनासाठी गर्दी होते. यामुळे या हंगामाचा कालावधी कमी मिळणार असल्याने व्यावसायिकांमध्ये थोडी नाराजी आहे.

सुटीच्या कालावधीत होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे येथे वाहतूक कोंडी, उतिउत्साही पर्यटकांचा उपद्रव असे प्रश्‍न भेडसावतात. त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. या वर्षी मुख्य धबधब्याकडे वनविभागाने आपले तीन कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त केले आहेत. सावंतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत सुटीच्या काळात जादा पोलिस कुमक ठेवण्यात येणार आहे. वाहनतळासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

आंबोलीत पर्यटनात उन्हाळी हंगाम चांगला गेला नाही. पावसाळ्यात दर शनिवार, रविवारी गर्दी असते. यात घाटात तसेच पर्यटन स्थळांवर वाहतूक कोंडीने पर्यटकांचा हिरमोड होतो. विजेचा लपंडाव याच हंगामतच सुरू असतो. दूरध्वनी, मोबाईल सेवा ठप्प असतात. याकडे प्रशासनाने योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक