BREAKING NEWS
HEADLINE NEWS
प्रधानमंत्री कार्यालयाच्यावतीने ‘महाराष्ट्र अहेड’चे कौतुक
Posted on: 19-06-2017

ऑनलाईन मिडिया, नवी दिल्ली 

केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित ‘3 इयर ऑफ रिबिल्डींग इंडिया’ शीर्षकाखालील ‘महाराष्ट्र अहेड’ या राज्य शासनाच्या मुखपत्राचे प्रधानमंत्री कार्यालयाद्वारे आज व्टिट करून कौतुक करण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी दर्जेदार मासिक प्रकाशित करण्याची दीर्घ परंपरा आहे. केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने महासंचालनालयाच्या वतीने माहे मे 2017 चा विशेषांक काढण्यात आला. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दु, गुजराती या भाषांमध्ये हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ‘3 इयर ऑफ रिबिल्डींग इंडिया’या शीर्षकाने ‘महाराष्ट्र अहेड’ हा इंग्रजी भाषेतील अंक प्रकाशित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने विकास व प्रगतीत घेतलेल्या भरारीचा धांडोळा घेणाऱ्या ‘महाराष्ट्र अहेड’ या अंकाचे कौतुक प्रधानमंत्री कार्यालयाच्या @PMOIndia या व्ट‍िटर हँडलहून करण्यात आले आहे.

या अंकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीलेला ‘भारताचे नवनिर्माण’ हा लेख आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विभागांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेणारे दिल्लीतील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींद्वारे लिखीत विविध लेख व मुलाखती आहेत. तसेच, गेल्या तीन वर्षात राज्य शासनाला केंद्राकडून प्राप्त विविध क्षेत्रातील मदत, केंद्र शासनाने पारदर्शी कारभारासाठी केलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदि विषयांवर लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक