BREAKING NEWS
HEADLINE NEWS
शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंत थकित कर्ज शासनाच्यावतीने भरण्याचा प्रस्ताव
Posted on: 20-06-2017

ऑनलाईन मिडिया, मुंबई

दुष्काळामुळे पीक आले नाही, नापिकी झाली आणि बँकेचे हप्ते भरता आले नाही या कारणामुळे 30 जून 2016 पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकित असलेले एक लाखापर्यंतचे कर्ज शासनाच्यावतीने भरण्याचा आणि 2016 ते 2017 या कालावधीत थकित झालेले परंतू कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पॅकेज देण्याचा प्रस्ताव शासनाच्यावतीने मांडण्यात आला आहे, अशी माहिती महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            शेतकऱ्यांच्या थकित कर्जमाफीसंदर्भात निकष ठरविण्यासाठी महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘थकित कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ची विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तथा शेतकरी प्रतिनिधींसमवेत आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेस कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते,सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.

            महाराष्ट्रात 2012-13, 2013-14, 2014-2015 आणि 2015-16 अशा सलग चार वर्षात दुष्काळ होता. या दुष्काळामुळे पीक आले नाही, नापिकी झाली आणि बँकेचे हप्ते भरता आले नाही. त्यामुळे थकित असलेल्या कर्जालाच रिझर्व्ह बँकेच्या नियमामुळे थकित कर्जाच्या संकल्पनेत आणता येते. त्यामुळे दिनांक 30 जून 2016 पर्यंतचे थकित कर्ज सरकार भरेल. 2016 ते 2017 यामध्ये ज्यांचे कर्ज थकित आहे त्यांच्याबाबतीतही जे नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी सरकार एक पॅकेज देईल असा प्रस्ताव सरकारच्यावतीने मांडण्यात आला आहे. 30 जून 2016 पर्यंतचे थकित कर्ज सरकारच्या वतीने भरताना त्याला अधिकतम एक लाख रुपयांची मर्यादा असेल. म्हणजेच एक लाखापर्यंतचे थकित कर्ज माफ केले जाईल, असाही प्रस्ताव सरकारने मांडला आहे.

            श्री. पाटील पुढे म्हणाले की, 30 जून 2016 पर्यंतच्या एक लाख रुपयांच्या वरची थकित कर्जे याबाबत संघटनेच्या नेत्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर सरकारच्यावतीने विचार केला जाईल. 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज देण्याबाबतच्या शासन निर्णयातील अटींविषयी चर्चा करुन या निर्णयातही सुधारणा करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक