BREAKING NEWS
HEADLINE NEWS
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार पुन्हा सक्रिय, घेणार कार्यकर्त्यांचा मेळावा
Posted on: 27-06-2017

ऑनलाईन मिडिया, पुणे

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील पराभवाने राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज झाले आहेत. मात्र त्यांनी पराभवाचे शल्य विसरुन पुन्हा एकदा शहरात लक्ष घालायचे ठरविले आहे. निवडणुकीतील पराभवानंतर पवार यांनी शहराकडे पाठ फिरवल्यामुळे कार्यकर्तेही मरगळले आहेत. त्यामुळे येत्या ६ जुलैला त्यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ ३६ जागांवर विजय मिळविता आला होता.

राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत अपयश आल्याने पक्षाचे नेते अजित पवार यांनी शहराकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद मिळविताना राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. या गटबाजीतून सावरत पक्षकार्याला वेग देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी चालविला आहे.

शहरातील राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्यांचा अजूनही अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने त्यांना कामाला लावणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ६ जुलैला शहरात येत आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक अध्यक्ष संग्राम कोते पाटील उपस्थित राहणार आहेत.

मरगळलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यात अजित पवार कितपत यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात

'उगवत्याला वंदन' या उक्तीप्रमाणे शहरातील राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी  मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. माजी शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने महिला विभागाची पुनर्बांधणी करण्यासाठी महिला प्रदेशअध्यक्षा चित्रा वाघ यांनी संघटनात्मक बांधणी करायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला  शहराध्यक्षपदी वैशाली काळभोर यांची नियुक्ती निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्याही पुनर्बांधणीचे पक्षाला वेध लागले आहेत. राष्ट्रवादी युवकच्या शहराध्यक्षपदासाठी विशाल वाकडकर व लाला चिंचवडे यांची नावे चर्चेत आहेत.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक