BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नाशिकमध्ये सर्वोत्तम नव-उद्योजकांचा गौरव
Posted on: 28-06-2017

ऑनलाईन मिडिया, मुंबई 

तरुण उद्योजकांना प्रोत्साहीत करणारा आणि नाशिक शहराला नव उद्योजकांचे शहर म्हणून नवी ओळख देणारा “बिझ अप” पुरस्कार सोहळा नुकताच ग्रॅण्ड रिओ नाशिक येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन माजी उद्योगमंत्री, वनाधिपती विनायक दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ग्रॅण्ड रिओचे संचालक चेतन पाटील, निमाचे सचिव धनंजय बेले, गुंतवणूकदार विवेक कापडनीस, अजय बोहोरा, अल्केश चोपडा, मोहन मेटकर, प्रवेश चौरसिया आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विनायक दादा पाटील यांनी नव- उद्योजकांना प्रोत्साहन दिले, आयुष्यात सगळ्याच गोष्टी करण्यापेक्षा जे आपल्याला चांगले जमते त्यावर काम करित राहावे. हे सांगताना त्यांनी हुशार मुलगा आणि मंद मुलाचे उदाहरण दिले. हुशार मुलांकडे बरेच पर्याय असल्याने तो बऱ्याच विषयात एकाच वेळी हात घालत असतो त्यामुळे तो नेहमी काळजीमध्ये असतो. पण मंद मुलगा जे त्याला जमतं आणि करणं शक्य आहे हे लक्षात आल्याने पूर्णपणे एकाच गोष्टीवर मन केंद्रीत करत असतो. त्यामुळे तो शांतपणे जे त्याला हवं ते करु शकतो अशा शब्दांत माजी उद्योगमंत्री विनायकदादा पाटील यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले. नवीन उद्योजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म ‘बिझअप’ने दिला, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे, असेही ते यावेळी म्हणाले.   

या सोहळ्यासाठी दिल्ली, नोएडा, ग्वालेर, जयपूर, चेन्नई, नाशिक, मुंबई, पुणे इ. शहरातून प्रवेशिका आल्या होत्या. ३०० स्टार्ट-अप बिझनेस मधून ५० स्टार्ट-अपची निवड करण्यात आली. या ५० नव-उद्योजकांनी आपल्या उद्योगाचे निवडसमितीचे सदस्य आणि गुंतवणूकदारांसमोर सादरीकरण केले. यातील १० उत्तम स्टार्टाअप्सनां “स्टार्ट-अप ऑफ द इयर” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच भांडवल कसे मिळवावे, पेटंट कसे करावे, कॉपीराईट कसे करावे, महिला उद्योजिका, उद्योग क्षेत्रातील विविध संकल्पना या विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले.

होरायझन ऍग्रोटेकचे संचालक विवेक कापडनीस, क्रेडीला फायनान्सचे अजय बोहरा आणि सीटी कल्चरचे अल्केश चोपडा आदींनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सदर नव-उद्योजकांनी आपल्या चौकटबाह्य उद्योगांचे सादरीकरण या परिक्षकांसमोर सादर केले. या सादरीकरणांमुळे विवेक कापडनीस प्रभावित झाले. या नव-उद्योजकांमुळे नाशिकमधील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

१० नव-उद्योजकांसह काही गुणी तरुणांना देखील गौरविण्यात आले. यामध्ये बॉलिवूड सिंगर संतोक सिंग यांना ‘फेमस सिंगर ऑफ दी इअर’, तनिष्क ग्रुपचे मुख्य विजय इंगळे यांना महिला सक्षमीकरणामध्ये मोलाच्या योगदानासाठी, उड्डाण तज्ज्ञ राहुल बोराडे यांना नाशिकमधील विमानतळाच्या योगदानासाठी, उद्योजिका निधी अगरवाल यांना सर्वोत्तम महिला उद्योजिका म्हणून गौरविण्यात आले.        

नव-उद्योजकांच्या चौकटबाह्य कल्पनांना मंच मिळावा. त्यांच्या उद्योजकीय संकल्पनेला कौतुकाची थाप मिळावी या उद्देशानेच बिझ-अप पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा इतर तरुणांना उद्योजकतेकडे वळवू शकला तर हे या कार्यक्रमाचे फलित असेल असे मत मुख्य आयोजक हितेश तराळ यांनी व्यक्त केले. हुनर तो सब मैं होता है, किसी छिप जाता है तो किसी का छप जाता है, या हुनरला पॉलिश करण्याचा प्रयत्न “बिझ अप” आहे असे मत विनायक वाडीले यांनी व्यक्त केले.

या पुरस्कार सोहळ्याची मूळ संकल्पना हितेश, विनायक, नयन आणि पंचम या पंचविशीतल्या तरुणांची होती. हितेश तराळ यांची गिझमोबॉक्स व डेटाबॉक्स ऑनलाईन टेकमीडिया कंपनी आहे. विनायक वाडिले आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू असून चेसविकी डॉट कॉम व ओमी या कंपनीचे संचालक आहेत. नयन जाधव हे स्वत:च्या सनआय कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना इंटर्नशीप देतात. पंचम भदे चाय टपरीचे संचालक आहेत.

या सोहळ्यासाठी शाह ग्रुपचे संचालक जितेंद्र शाह, हॉटेल किंग विश्वास सरपोतदार, मयूर कापडी, देवेन भोई, ऋषिकेश कांकरिया, निखील भुजबळ, शुभम चांदसरे, महेश तावडे, मयूर चव्हाण आणि युक्ती मीडियाच्या अर्चना सोंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक