BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नाशिक बोट क्लबची एमटीडीसीच्या एमडींनी आ.जयवंतराव जाधव यांच्यासोबत केली पाहणी
Posted on: 28-06-2017

ऑनलाईन मिडिया, नाशिक

गंगापूर येथील बोट क्लब व मेगा पर्यटन संकुलाचे काम पूर्ण झाले असतांना ते अद्यापही सुरु न झाल्याने आमदार जयवंतराव जाधव यांनी मुंबई येथे झालेल्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या बैठकीत पर्यटन विभागाचे कार्यकारी संचालकांनी त्याची पाहणी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी आज (दि.२७ जून) गंगापूर येथील बोट क्लब व मेगा पर्यटन केंद्राची आमदार जाधव यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी नाशिक प्रादेशिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन मुंडावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सरचिणीस संजय खैरनार यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटनाचा विकास व्हावा व पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालविता यावा यासाठी तात्कालीन पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून गंगापूर येथे मेगा पर्यटन केंद्र साकारण्यात आले. त्यात गंगापूर धरणामधील  बोटक्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रिडा संकुल, कन्व्हेन्शन सेंटर  व गोवर्धन येथील कलाग्रामला आदीचा समावेश असून सन २०१४ साली बोट क्लबचे काम देखील पूर्ण झाले मात्र अद्यापही ते सुरु झाले नाही. त्यामुळे आमदार जाधव यांनी बोटक्लबची पाहणी करून ते लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी केली होती.

 

त्यानुसार आज झालेल्या पाहणी दौऱ्यात मेगा पर्यटन संकुलाबाबत पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांना आमदार जाधव यांनी मेगा पर्यटन संकुलाची सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली. आ.जाधव यांनी यावेळी सांगतिले की, प्रादेशिक पर्यटनमधील निधीमधून येथील जागतिक दर्जाच्या बोट क्लबचे काम मार्च २०१४ मध्ये पूर्ण झालेले आहे. हा बोट क्लब गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर भागात असून या ठिकाणी जेट्टी , प्रशासकीय इमारत , इक्विपमेंट करिता देखभाल दुरुस्ती शेड , प्रेक्षकगृह , खुले सभागृह , वाहनतळ इ. तयार करण्यात आले असून पर्यटकांना बोटिंगसाठी यु.एस.ए मेड युरो ४ नॉर्मच्या ४७ अत्याधुनिक बोटी धरणस्थळी दाखल झालेल्या आहेत. पक्षांबाबत  जनजागृतीसाठी पक्षीमित्रांकरिता स्वतंत्र कार्यालय आणि पक्षांच्या चित्रांचे दालन येथे आहे. मात्र सदर बोट क्लब अजुन सुरु झालेला  नसल्याचे आ.जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

          त्याचबोरबर प्रादेशिक पर्यटन व केंद्रिय सहायता निधी मधून 'पर्यटक निवास' व 'लेक व्ह्यू नेचर्स रिसॉर्टचे' काम प्रगतीपथावर आहे. अंतर्गत सजावट , विद्युतीकरण , पाणीपुरवठा  , अग्निशामक यंत्रणा व बाह्यपरिसर सुशोभिकरण इ. कामे अपूर्ण आहेत. द्राक्ष पर्यटनासह नाशिक वाईन व वायनरीला पर्यटकामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी सदर ग्रेप पार्क रिसॉर्ट (लेक व्ह्यू नेचर्स रिसॉर्ट) चा उपयोग होणार आहे. या ठिकाणी एकूण ११० कक्ष प्रस्तावित  असून पहिल्या टप्प्यामध्ये २८ कक्ष तसेच उपहारगृह , सभागृह जलतरण तलाव , आयुर्वेदिक स्पा व मसाज केंद्र , वाईन टेस्टिंग केंद्र , द्राक्ष महोत्सवाकरिता पायाभूत सुविधा इ. सोयीसुविधा या ठिकाणी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रादेशिक पर्यटन योजना तर केंद्रिय सहायता मधून या साहसी क्रिडा संकुलात प्रशासकीय इमारत , अभ्यांगत कक्ष , इनडोअर क्रिडा करिता इमारत तसेच रॉक क्लायम्बिंग , सायकल ट्रॅक , घोड्स्वारी इ.बाहय क्रिडा करिता पायाभूत सुविधा तयार होत आहेत.यामध्ये लहान मुलांकरिता ५ डी थीएटर , आईस स्केटिंग , लेझर झोन इ.खेळांसाठी सुविधा, खुले उपहारगृह , लॉकर , चेजिंग रूम , सोव्हिनिअर शॉप , स्वच्छतागृह , वाहनतळ इ.सुविधा  सदर संकुलातील स्थापत्य कामे प्रगतीत आहे.तसेच कन्व्हेन्शन सेंटर बनविण्यासाठी गंगापूर धरणाजवळ केंद्रिय सहायता निधीमधून अनुदान  मंजूर आहे. त्यामधून १५०० व्यक्तीना बसण्याची व्यवस्था होईल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटरचे बांधकाम २०० व्यक्तींसाठी बैठक व्यवस्था असलेले दोन कन्व्हेन्शन हॉल , ५० व्यक्तींच्या बैठक व्यवस्थेचे ४ हॉल तसेच प्रदर्शनी हॉल , रेस्टॉरंट , प्रसाधनगृह , वाहनतळ इ.सुविधा प्रस्तावित. मात्र सदर काम अजूनही सुरु नसल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच एम.टी.डी.सी.कडून 'दिल्ली हाट' च्या धर्तीवर नाशिक शहरात गोवर्धन येथे सन २०१४ मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात येऊन पुरेशा निधी अभावी बंद पडले आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक कायमची बाजारपेठ या माध्यमातून साकारण्याचा उद्देश आहे. या बाजारपेठेत आदिवासी बांधवानांही त्यांच्या कलेचे प्रदर्शन करता येईल तसेच त्यांच्या हस्तकलेतून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची त्यांना संधी मिळणार आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटनामध्ये भरीव वाढ होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रशासकीय इमारत,वर्कशॉप इमारत,खाद्य पदार्थांसाठी गाळे व ९९ व्यापारी गाळ्यांचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र प्रवेशद्वार,पुढील कुंपणभिंत,अंतर्गत रस्ता,बाहयविद्युतीकरण, पाणीपुरवठा इ.कामे पुरेशा निधी अभावी अपूर्ण आहेत, या अपूर्ण कामांसाठी राज्य शासनाने एकरक्कमी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा आणि कलाग्राम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी जाधव यांनी केली.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक