BREAKING NEWS
HEADLINE NEWS
हत्तीरोगाला प्रतिबंध करण्यासाठी औषधोपचार मोहीम सुरु
Posted on: 27-07-2017

ऑनलाईन मिडिया, ठाणे

जिल्ह्यातील भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात हत्तीरोगावरील औषधोपचार मोहीम सुरु झाली असून ती ३० जुलैपर्यंत चालणार आहे. यामध्ये गरोदर माता, आणि दोन वर्षांखालील मुले सोडून सर्वाना सामुदायिकरित्या डीईसी गोळया व अलबेंडेझोल गोळ्यांची मात्रा देण्यात येणार आहे असे जिल्हा हिवताप अधिकारी यांनी सांगितले आहे. नुकतीच यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडे एक बैठक होऊन त्यात ही मोहीम कशा रीतीने राबविण्यात येणार आहे ते स्पष्ट करण्यात आले. भिवंडी व मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातील काही प्रभागांमध्ये देखील हि मोहीम चालणार आहे. 

हत्तीरोग आयुष्यभर राहू शकतो. उपचार केले नाहीत तर ही परिस्थिती आणखी बिकट होते. तथापि याचा उपचार संसर्ग होताच सुरू करावा लागतो. परंतु त्वरित उपचार शक्य होत नाहीत कारण प्राथमिक स्तरावर या रोगाचे निदान होत नाही.

हत्तीरोगाला वैद्यकीय भाषेत लिम्फॅटिक फायलेरिअॅसिस असे म्हणतात. हा एक परजीवी आजार असून तो विशेषत: डासांच्या माध्यमातून पसरतो. हत्तीरोग झालेल्या माणसाच्या शरीरात लाखोंच्या संख्येने मायक्रोफायलेरिया असतात, अशा माणसास चावलेला डास जेव्हा दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात दुषित अळ्या सोडल्या जातात. पोलिओनंतर फायलेरिऑसिस म्हणजे हत्तीरोगास अपंगत्वाचे दुसरे मोठे कारण मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने २०२० पर्यंत जगभरात याचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

डीईसी गोळया व अलबेंडेझोल गोळ्या पूर्णपणे सुरक्षित असून या मोहिमेत प्रत्येक व्यक्तीला ४०० एमजी गोळ्या देण्यात येतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर औषधोपचार झाल्याने हत्तीरोगाचा प्रसार होऊ शकणार नाही असे डॉ तरुलता धानके यांनी सांगितले.  

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक