BREAKING NEWS
HEADLINE NEWS
कायदा आणि सुव्यवस्थेचे सरकारने काढले धिंडवडे - अजित पवार
Posted on: 22-12-2017

ऑनलाईन मिडिया, नागपूर

महाराष्ट्र राज्य महिलांचा विनयभंग, छेडछाडमध्ये पहिल्या क्रमांकावर, ज्येष्ठ नागरीकांवरील वाढत्या हल्ल्यामध्ये देशात महाराष्ट्र पहिला, ऑनलाईन सायबर गुन्हयामध्ये उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्राचा नंबर, लहान मुलांवरील अत्याचारामध्ये दुसऱ्या क्रमांकावर अशा अनेक गुन्हयामध्ये महाराष्ट्र पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.पोलिसांवरील हल्ले आणि पोलिसांचे अत्याचार यांचे वाढलेले प्रमाण, या सगळयामध्ये राज्याची बदनामी होत आहे. ज्या आशेने, अपेक्षेने महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला निवडून देण्याचे काम केले ते सरकार आज कशाप्रकारचे काम करत आहे याचा विचार जनतेने करावा असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवार यांनी या सरकारच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण आणि गुन्हेगारीच्या क्रमांकाने महाराष्ट्राची होत असलेली बदनामी यावर सरकारला धारेवर धरले.

अजित पवार यांनी राज्यातील गुन्हेगारीच्या वाढलेल्या प्रमाणाची आकडेवारी सभागृहामध्ये सादर केली. राज्यात ६ हजार ६०० गुन्हे घडले आहेत ही आकडेवारी १८ टक्के आहे. ऑनलाईन सायबर गुन्हयामध्ये उत्तरप्रदेशनंतर जर कुठल्या राज्याचे नाव येत असेल तर ते महाराष्ट्र राज्याचे आहे. राज्यात ३ हजार २८० एवढी सायबर गुन्हयांची नोंद झाली आहे. लहानमुलांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सायबर गुन्हयापासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष सायबर पोलिसांची टीम तयार करण्यात आली होती. परंतु भविष्यात घडणाऱ्या घटनांचा सारासार विचार न केल्यामुळे अशा गुन्हयांना आळा घालण्यात पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढलेल्या सायबर गुन्हयामुळे पोलिसदल अगदी जेरीस आले आहे. २१ व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे परंतु तंत्रज्ञानाने नवीन गुन्हयाला जन्म दिला असून त्याची सर्वाधिक झळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला बसली असल्याचे अजित पवार म्हणाले.

सरकारने कॅशलेस सेवेसाठी आग्रह धरला होता. नोटाबंदीच्याकाळामध्ये कॅशलेस व्यवहाराचा मोठा धांडोरा सरकारने पिटला होता. परंतु कॅशलेसमध्ये सुरक्षितता राहिलेली नाही. इंटरनेटच्या साहाय्याने लाखो रुपये पळवण्याचे गुन्हे घडत आहेत. एवढेच पुरेसे नाहीतर सायबर चोरटे सर्वसामान्यांनाही सोडत नाहीत. भविष्यात हे आव्हान अधिक कठिण होत राहणार आहे असेही अजित पवार म्हणाले.

मुंबई शहरामध्ये दिवसाला ५० ते ६० सायबर गुन्हयांच्या तक्रारी पोलिस ठाण्यामध्ये दाखल होत आहेत. आपल्या मेलवर स्पॅममेल येतात, नेटबॅंकींग असेल तर त्याचे पासवर्ड हॅक केले जात आहेत. कामाच्या ओघात किंवा वारंवार येणाऱ्या मेसेजला उत्तर आपण देतो आणि सायबरच्या जाळयात फसतो असेही अजित पवार म्हणाले.

सायबर गुन्हयांमध्ये हॅकींग आणि हॅकर्सचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये ई-कॉमर्सचे प्रमाण राज्यात ३१ टक्के इतके आहे. राज्यात व्हायरस अँटक गुन्हयाचे ६० टक्के प्रमाण आहे. याचा अर्थ राज्यामध्ये बेकारीचे प्रमाणही वाढले आहे. सरकारने सत्तेवर आल्यावर दरवर्षी २ कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे जाहीर केले होते. सरकारने साडेतीन वर्षात ७ कोटी युवकांना नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. परंतु याचा कुठेच ठावठिकाणा नाही.त्यामुळेच बेकारांची संख्या वाढत चालली आणि यातून तरुण पिढी चुकीच्या रस्त्याने जाताना दिसत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

सायबर गुन्हयांच्याबाबतीत कमालीची अनास्था पहायला मिळत आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी चार सायबर पोलिस ठाणी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यासाठी वांद्रे येथे जागाही संपादीत करण्यात आली होती. शिवाय या पोलिस ठाण्यासाठी उपायुक्त दर्जाचा पोलिस अधिकारीही नेमणूक करण्यात आला होता. मुख्यमंत्र्याच्या या घोषणेला दीड वर्ष झाले आहे. परंतु सायबर ठाण्याचा अदयाप पत्ता नाही. निव्वळ जाहिरातबाजी आणि घोषणा बाकी काही नाही, कृती शून्य असल्याची टिका अजित पवार यांनी केली.

राज्यातील नोकरदार महिलांच्या सुरक्षेचे धोरण सरकार आणायला तयार नाही. महिलांच्या मनोधैर्य योजनेबाबत न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महिला सुरक्षितेबाबत सरकार उदासिनता का दाखवते असा सवाल अजित पवार यांनी सरकारला केला.

यासह अनेक मुद्दयांना अजित पवार यांनी हात घालत सरकारची पोलखोल केली. जवळजवळ ४० ते ४५ मिनिटे सभागृहात केलेल्या भाषणामध्ये सरकारच्या एकंदरीत कारभारावर सडेतोड टिका करताना जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. त्यांनी सरकारला या सगळ्या गोष्टींचे आत्मपरिक्षण आणि आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला. 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक